Thursday, February 12, 2009

पोपट झाला रे !

परवा दिवशी सकाळी ऑफीसमध्ये आलो तेच एकावर एक धक्के खात.नेहमीप्रमाणे गेटवर बाईक थांबवली आणि एकदा हॉर्न देवुन वाट बघत बसलो.आमचा सिक्युरिटी गार्ड गेट सोडुन कुठेही असु शकतो. त्यामुळे रोजची सवय झालीय आता , हॉर्न द्यायचा आणि गाडी बंद करुन त्याची वाट बघत बसायचे. परवा दिवशी मात्र हॉर्न वाजवला आणि साहेब हजर....मी अवाक वगैरे झालो...," किशनजी आज तबियत तो ठिक है आपकी?" तो आपला उगीचच हसला.." का करे साहब, हम तो नामका सिक्युरिटी गारड हु, बाकी काम तो सब करने पडत है हिया!पर आजसे हम पहले हॉरनपे मिलुंगा आपको...ईस्टिरिक्ट वारनिंग मिला है....कोई बडा गोरा साबलोग आने वाला है !"मी खुशीतच वर आलो..चला सुधारणेला वाव आहे....निदान गोर्‍या साहेबासाठीका होईना बदल होताहेत..हे ही नसे थोडके............................!
वर माझ्या क्युबिकलपाशी आलो तर प्युन शोधत आला," विशालसर तुम्हाला समाद्दारसाहेब शोधत होते"कमांडर समाद्दार, आमचे पर्सनल कम अँडमिन मँनेजर...मी थेट त्यांना जावुन भेटलो...विशाल तुम्हारा अपने क्युबिकलको लेकर कोइ कंप्लेंट हो तो अभी बोल दो..फोन, कंपुटर (ते काँम्प्युटरला कंपुटर म्हणतात).जो भी हो अभी बता दो... मन्डेको क्लास वेस्टर आ रहा है ! that time every thing should be fine. आमच्या कंपनीच्या हेड क्वार्टर्सहुन एक अँड्व्हायजरी बोर्डाचं पँनेल येणार होतं. आणि "क्लास वेस्टर" हा समग्र फ्युग्रो ग्रुपचा चेअरमन आहे. मला एकदम गहिवरुन वगैरे आलं....तो क्लास वेस्टर समोर असता तर त्याला मनातल्या मनात कडकडुन मिठी मारली असती मी. (मनातल्या मनात एवढ्यासाठी कि तो पुर्ण फ्युग्रो ग्रुपचा बाप आहे..त्याच्या पुढे माझी उंची कमी पडली असती...दोन्ही अर्थाने... )पण मी लगेच लिस्ट करायला घेतली....१. दिड महिन्यापासुन बंद असलेला फँन (आमचा एसी वीज बचतीचा पुरस्कर्ता आहे)२. वारंवार लटकणारा (हँग होणारा) संगणक३. १८५७ मधले डस्टबिन४. डोक्यावर लटकणार्‍या विजेच्या तारा५. मधुनच असहकार पुकारणारा टेलिफोन सेटबरंच काही होतं हो......
लिस्ट अँडमिन डिपार्टमेंटला दिली आणि पुढची सुचना ऐकुन " क्लास वेस्टर ला शिव्या घालायला सुरुवात केली. लिस्ट दिली हो पण पण एसी चालु असेलच किंवा फँन सुरु होईलच याची शाश्वती नाही आणि हे सांगताहेत please be well dressed,( म्हणजे सुट आणि टाय घालुन या दोन दिवस हा गर्भितार्थ)मग आमची घरात (सुशिक्षित बेकाराप्रमाणे) पडिक असलेला सुट शोधण्यापासुन सुरुवात.....(लग्नातला नाही हो....त्यानंतर परवाच्या मे मध्ये शिवला होता..हॉलंडला जाताना. (मी पण जावुन आलोय हो !) मग त्याच्या ड्रायक्लिनिंगपासुन तयारी....(१५० रुपये, माझी एक महिन्याची एरियल आली असती तेवढ्यात...इति सौभाग्यवती). आणि मी चक्क बुट पॉलिश करुन घेतले. कधी नव्हे ती पार्लरला..... जावुन दाढी केली तिही फेशिअल सहित.
सोमवारी सकाळी सुट घातला आणि आईसाहेबांनी सांगितलं.. टाय प्रेस करुन घे रे.. छान हाताने धुतलाय मी..मशिनला नाही टाकला. तुम्हा आजकालच्या लोकांना कष्टच करायला नको. (हा पुष्पगुच्छ आमच्या सौं. साठी होता) मी आधी किचनकडे नजर टाकली (घाबरत घाबरत) . ह्यां.....तिचं लक्षच नव्हतं....हे निश्चित झाल्यावर मग कपाळावर हात मारला. आणखी एक टाय शहीद झाला...मी मनोमन त्याला (आणि ३७५ रुपयांना) श्रद्धांजली वाहुन रिकामा झालो. सुट घालुन बाईकवर कसं जायचं म्हणुन चक्क घरापासुन रिक्षाने ऑफीसला आलो. (नशीब आमच्या घरापासुन टँक्सी स्टँड खुप लांब आहे. [उगीचच आपलं काटकसरीपणाचं समर्थन (कोण रे तो..कंजुष म्हणणारा) ] .
ऑफीसमध्ये आलो तर सगळीकडे अनोळखी माणसं दिसायला लागली. साहजिक आहे म्हणा, आम्हाला 'क्रिश' मधला हृतिक बघायची सवय....लक्ष्य पाहताना अनोळखी वाटणारच की ! पण सगळं कसं ग्वाड वाटत होतं. नेहमी चप्पल घालुन फिरणारे प्युनसुद्धा टाय मध्ये....!"शोभा कितने बजे आ रहे है वो लोग?"विशाल, तेरा अगला जनम बुक नही हुवा है ना अभी, मेरा क्लेम पहिला है, याद रखना.....हे मात्र अन्यायी होतं हा...अगला जनम क्युं?...............हे ही मनातच, प्रत्यक्षात मात्र," अगं बाई, माझी बायको दर वर्षी वडाची पुजा करते गं." आम्ही पापभिरु ना?.....[पापभिरु म्हणजे नक्की काय..पापाची भीती वाटणे की भीती वाटते म्हणुन पाप न करणे?]अर्थात, ती काय मागते हे तिलाच माहित..बहुदा..पुढच्या वर्षी हाच जर आला तर पुजा करणे सोडुन देइन अशी धमकी देत असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.
शोभा मैने तुमसे कुछ पुछा है.......(सात्विक वगैरे संताप, का सगळं मनातच बोलावं लागतं याचा राग?)दो बजे के बाद ही आयेंगे यार, क्यु टेंशन लेता है?.. इति शोभा"एक काम कर आजका दिन ये सुट पहनके मेरी सिटपे बैठ जा, मै तेरी जगा पे ऑपरेटर बन जाता हु आज . हे देखिल मी मनातच म्हटलं...कारण नेमकी ती कधी नव्हे ते साडी नेसुन आलेली. आणि तिला सुट दिल्यावर मी काय घालु....साssssssssssss ! नो वे ?
आधी दोन वाजले...शोभाचा बझ आला..विशाल..वो लोग आ गये..............!आम्ही पटापट टेबल वगैरे आवरुन तयार..ऑफीसच्या इमारतीत दोन स्वतंत्र सेक्शन आहेत, प्रोजेक्ट आणि अँप्लिकेशन. आम्ही अँप्लिकेशनवाले..त्यामुळे आमचा नंबर थोडा उशीरा होता. सगळे सजवलेले बकरे वाट पाहात होते. त्याच्या येण्याची नव्हे....येवुन जाण्याची. कारण वर व्यक्त केलेल्या शंकेप्रमाणे एसी ठिक झालेला नव्हताच आणि डोक्यावरच नुकताच रिपेअर केलेला पंखाही घायकुतीला येवुन हातघाई करत होता.त्यामुळे कधी एकदा सगळं संपतंय असं झालं होतं.(मला सांगण्यात आलं होतं.. कंपुटर रिपेअरके लिये कोटेशन मंगवाया है, तब तक तुम अपना लँपटॉप निकालके टेबलपे रख देना... म्हणजे रिपेअर्स..वाट बघा! असं....)
तीन वाजले....वो लोग लँब मे है....कभी भी तुम्हारे डिपार्टमेंट्मे आ सकते है..... इति श्रुती.. secretary to MD.
तीन पस्तीस...विशाल, वो लोग यार्ड मे है...च्यायला आम्हाला बहुतेक संध्याकाळपर्यंत तंगवणार..इति मि.सुर्या, Sr. Engineer, Projects.
चार वीस...( चार शे वीस साले, फुकट पिळताहेत)विशाल, वो लोग अब कँटीन देख रहे है....अगला पडाव शायद अँप्लिकेशन ही होगा....इति आलोक, Lab Engineer.
पाच वाजुन पंधरा मिनीटे....शोभाचा फोन....
विशाल, वो लोग बाहर निकल रहे है.............................?
विशालच्या बैलाला ssssssssssssssssssss हो ssssssssssssssssssssss!

विशाल




प्रगती

ए sssssssssssssssss टकी, सळ्ळै sssssssssssssssssssssssss य्या !
नेहेमीप्रमाणे ललकारी ऐकु आली आणि मी बाहेर आलो." नमस्कार आज्जी, आज काय म्हणताय? काय काय आहे आज डोक्यावरच्या पाटीत? आणि काय काय चाललंय तुमच्या, पाटीखालच्या डोक्यात?"सुरुवातीला, साधारणपणे दोन वर्षापुर्वी कुर्ल्याच्या पोलीस क्वार्टर्समधुन इकडे शिफ्ट झालो, तेव्हा आज्जी काय म्हणताहेत ते कळायचेच नाही. आणि आम्ही सगळी भाजी थेट मंडईतुन आणायचो."प्रत्येक पेंडीमागे किमान रुपया वाचतो"....इति सौभाग्यवती(आता रिक्षाला दुप्पट पैसे जातात हे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करण्यासाठीच असते)
पण आज्जींच्या टकी, सळ्ळै...ने वाढलेली उत्सुकता काही कमी होत नव्हती..मग एका रविवारी सकाळी मी मुद्दाम, अगदी फ्रीज भाज्यांनी भरलेला असतानाही त्यांना हाक मारली...ओ, आज्जीबाई..........आधी त्यांनी ऐकलेच नाही बहुदा, म्हणुन पुन्हा हाक मारली.....ओ भाजीवाल्या आज्जी, इकडे इकडे वर, पहिल्या मजल्यावर....बाल्कनीत,त्या थांबल्या, तसा मी म्हणालो...थांबा मी येतो खालीच...मी पटकन खाली गेलो, त्यांची पाटी उतरवली डोक्यावरुन.....काय करणार बाबा, मला रोजची "ए भाजीवाली...अशी हाक ऐकाची सव. येवडी मायेने मारलेली हाक न्हाय रं कळत. बोल काय पायजे, आन बायको कुटंय तुजी? भाजी घ्याया बाप्या माणसाला पाटीवतीय...?नशिबाची हाय रं...... पोर !म्हातारी बरीच फटकळ पण गोड होती हो...आज्जी, पहिल्यांदा तुम्ही ते काय ओरडता ते सांगा....आता भाजीवाली दुसरं काय वरडणार बाबा.. मटकी, वाल, पावटे, गवारी असलं कायबाय असतं बाबा...वरडते मंग, मटकी उसळ्ळ..............................आयला............................................... मटकी उसळ आणि टकी सळ्ळै....य्या............!पण माझी आणि आज्जीची मस्त दोस्ती झाली. मी ओ आज्जीबाईवरुन ए आज्जीवर आलो.आता दर रविवारी आमच्या बिल्डिंगच्या खाली आली की आज्जीच हाक मारते...." इशुनाथा, (तिला माझं विशाल हे नाव उच्चारायला अवघड वाटतं) ताजी ताजी कारली हायेत बग, तुज्यासाटनं ठिवलीत येगळी.' माझ्या सगळ्या आवडी निवडी सुद्धा तिला चांगल्या माहित झाल्याहेत.
परवा, मात्र आज्जीनी धक्काच दिला." इशुनाथा, , काल मार्केटात मानसं म्हनत व्हती, तकडं लांब पर्देसात कुनीतरी हरिजन बाबा मोटा मंतरी जाला म्हनं ! आमचं दिस कंदी येणार.....?" ,अँज युज्वल माझी थोडीशी उशीराच पेटली....पण पेटली तेव्हा मी फुटभर उडालो.
आज्जे, तुला गं काय फरक पडतोय त्याने, तो बराक ओबामा अमेरिकेचा अध्यक्ष झाला. तुला का एवढी उत्सुकता ?
न्हाय रं बाबा, तसं न्हाय ते, आता मी र्‍हाती तकडं साटण्याला, म्हारवड्यात . काल कुनीतरी म्हनलं आपल्या लोकांनी म्हनं चांदुबावर गाडी पाटीवली, तेस्नी ह्यो म्हारवडा कामुन लांब वाटतुया...?
या प्रश्नाला माझ्याकडे खरंच उत्तर नव्हते, मी उगाचच सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला..."काय आज्जी, तु पण घेवुन बसलीय, अगं आता असं कुठं काही राहिलंय का? आता दलित, हरीजन सुद्धा सवर्णांच्या खांद्याला खांदा लावुन काम करतात. आता तुझंच बघ ना, तु आता थेट आमच्या किचनपर्यंत येतेस. तुझ्या तरुणपणी कधी वाटलं होतं का असं होईल म्हणुन.....आपल्याकडे पण दिवस बदलले आहेत गं आता.आपले माजी राष्ट्रपती डॉ. अबुल कलाम सुद्धा अल्पसंख्यांक, मागासवर्गीय समाजातलेच होते ना?
न्हाय रं बाबा, त्यात सुदिक फरक हाये. जेच्याकडं पसा हाये तेंची व्हतीय की परगती. पन आम्च्यासाटनं न्हाय रं बाबा काय बी? आमची आटवन फकस्त निवडनुकाच्या टायमाला व्हती त्यास्नी. आन तुज्या घरात येक येती म्या आतपत्तुर का तं तुजी बायल हाय गुनाची...नायतर तुज्या शेजारची देशपांडीण.....दारापासुन दोन फुट लांब बसवती मला. पैसं बी वरुन टाकती.आता मला कळलं, आधी नेहेमी ,विशु - सायली करत सारख्या काही ना काही मागायला येणार्‍या देशपांडे काकु आमच्याकडे यायच्या, बोलायच्या अचानक बंद का झाल्या ते?
येती रं बाबा, भाजी संपवायची हाय समदी, न्हाय तर चुल पेटायची न्हाय रातच्याला?तकडं त्यो बाबा कुणी मोटा मंतरी व्हवु द्या, न्हायतर हकडं लोकांस्नी चांदुबावर जावु द्या...मस्नी भाजी इकावीच लागणार. न्हाय तर खायाचं काय?
आज्जी गेली तिच्या कामाला, पण मनात असंख्य प्रश्न उभे करुन...
माझ्या कानात राहुन राहुन तिचं एकच वाक्य पुन्हा पुन्हा आदळंत होतं...
"काल कुनीतरी म्हनलं आपल्या लोकांनी म्हनं चांदुबावर गाडी पाटीवली, तेस्नी ह्यो म्हारवडा कामुन लांब वाटतुया...?"
विशाल.

संभा

"संभा...या दोन पेपर्सच्या झेरॉक्स आणुन दे बाबा.....!"
संभा..ही फाईल अकाउंट्मध्ये नेवुन दे रे..............!
संभा......काल बाईंडिंगसाठी दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आणलास का परत.........!
संभाजी.....अरे, त्या एसी सर्व्हिसींगवाल्याला फोन करायला सांगितला होता तुला, तो अजुन उलथला नाही...!
संभा....दोन चहा...............!
संभा......तो कालचा ड्राफ्ट चेक केलास....प्रत्येक गोष्ट किती वेळा सांगायची रे तुला...?
संभा.............?
हे रोजचंच होतं तेव्हा, हि वाक्ये कानावर आल्याशिवाय आमचा दिवसच मुळी जात नसे. आणि स्वतः संभालाही त्याशिवाय ऑफीसला आल्यासारखं वाटत नसेल. मुळात संभा कोण...हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेलच म्हणा. तरी देखिल सांगतो. संभा आमच्या ऑफिसचा प्युन कम क्लार्क कम टेलिफोन ऑपरेटर कम पोस्ट्मन कम........बरंच काही.
संभाजी तुकाराम जाधव. ७-८ वर्षांपुर्वी सातार्‍याजवळच्या कुठल्याशा खेड्यातुन नोकरीच्या शोधात संभा मुंबईला आला. गावाकडे तीन एकर शेती ( बहिणीच्या लग्नात गहाण पडलेली)..दोन खोल्यांचं एक जुनाट घर...आणि त्या घराइतकीच जुन, जर्जर झालेली, थकलेली वृद्ध आई. वडील संभाच्या लहानपणीच...........................एका तमासगिरीणीच्या नादी लागुन परागंदा झालेले.
गावातल्या शाळेत कसे बसे एस. एस. सी. करुन संभा नोकरीच्या शोधात मुंबईला मामाकडे आला होता. परळच्या बी.डी. डी. चाळीत मामाच्या घरी...घरी म्हणण्यापेक्षा घरासमोरच्या बाल्कनीत राहात होता. बिचारा मामा तरी काय करणार, त्याची स्वतःची तीन लेकरे, बायको.......अगदी सख्खा भाच्चा असला तरी एकुलत्या एक खोलीत किती जण राहणार...! मामी बिचारी रोज वेळेवर जेवायला वाढत होती हेच नशीब. पण संभा बहुदा हे सगळं गृहित धरुनच आला होता.
तेव्हा मी ठाण्याच्या एका छोट्याशा फर्ममध्ये सेल्स/सर्व्हिस इंजिनीअर म्हणुन काम करत होतो. तो दिवस अजुनही आठवतो. दुपारी एक- दिड वाजला होता. आम्ही सगळे डबे उघडुन उदरं भरणंचे पवित्र कार्य आटपत बसलो होतो. एक काळा सावळा, किडकिडीत मुलगा आत आला. त्यावेळचं आमचं ऑफीस म्हणजे १५ X २५ चा एक लंबुळका हॉल होता. एक पार्टिशन घालुन बॉसची केबीन बनवली होती. बाकी टेबलच्या दोन रांगा..एकुण पाच टेबलं....आणि आणखी एक पार्टिशन घालुन दर्शनी बाजुला रिसेप्शनिस्ट्चे टेबल. त्यामुळे कोणीही आले की लगेच दिसायचे. अशात तो आला..साहेबांना भेटायचेय म्हणाला. त्याला बसायला सांगुन आम्ही पुन्हा एकदा डब्यावर तुटुन पडलो. मध्येच मला काय वाटले कुणास ठाउक मी त्या मुलाला हाक मारली, नेहेमीच्या सवयीप्रमाणे" या जेवायला," ..मी आपला सहजच म्हणालो होतो, पण तो खरोखरच आला आणि चक्क जेवायला बसला...बाकीची चांडाळ चौकडी " असंच पाहिजे...कुणी सांगितला होता नसता आगावुपणा...?" या अविर्भावात माझ्याकडे पाहत होती. तो व्यवस्थित जेवला. जेवता जेवताच कळालं कि तो नोकरीच्या शोधात आलाय म्हणुन. मग तर .....? , नंतर आमचा छान उद्धार होणार हे भवितव्य मला कळुन चुकले.
तो साहेबांना भेटला. त्याचं नशीब खरोखर जोरावर असावं, आधी फुकटचं जेवण आणि आता तर दरमहा आठशे रुपये (?) पगाराची नोकरी. उद्यापासुन येतो म्हणुन तो गेला.जेवण करुन मी आमची धोकटी उचलली आणि बाहेर पडलो. तर तो खालीच उभा होता. मी साहजिकच रेंगाळलो..तो पुढे आला..."खुप उपकार झाले साहेब. तुम्हाला वाटले असेल..ओळख ना पाळख, बोलावले कि आला अन बसला जेवायला. पण काय करु साहेब, सकाळपासुन फिरतोय. खिश्यात होते तेवढ्या पैशात दादर पासुन ठाण्यापर्यंतचं तिकीट काढलं...भुक लागली होती पण.....तशात तुम्ही बोलावलं...खुप लाज वाटली पण मन घट केलं अन तसाच निर्लज्जासारखा जेवलो. आता इथुन परळपर्यंत चालत जायचं म्हणजे अंगात ताकद पायजे ना? येतो साहेब...उद्यापासुन येतोय कामाला. तो निघाला..
मला काय वाटलं कोण जाणे पण त्याला म्हंटलं चल कुर्ल्यापर्यंत सोडतो तुला. त्यावेळेस माझी चेतक होती."हमारा बजाज.". कुर्ल्याला जाईपर्यंत तो अखंड बडबड करत होता.आपल्या पळुन गेलेल्या बापाबद्दल आणि अडकुन बसलेल्या आईबद्दल सांगत होता.उतरताना मी त्याला १०० रुपये दिले आणि सांगितलं ." महिन्याचा पास काढुन घे ट्रेनचा, पुढच्या महिन्यात पगार झाला की दे परत".त्याने फक्त हात जोडले.आता विचार केला कि माझं मलाच आश्चर्य वाटतं, कसलीही ओळख नसताना, त्याची कसलीही माहिती नसताना मी त्याला तेव्हा कसे काय पैसे दिले असतील? कारण मी तसा काटकसरी माणुस आहे. (आता माझ्या मित्रांची काटकसरीपणाची व्याख्या कंजुष अशी आहे, यात माझा काय दोष?)
पण त्यानंतर संभा आमच्यात रुळला. इतका रुळला की त्याच्यावाचुन आमचं पान हलेना झालं. झलक वर दिलेली आहेच. शिक्षण फारसं नव्हतं एवढंच काय ते त्याचं न्युन. पण त्याचं त्यामुळे काहीही अडत नसे. हळु हळु बॉसला सुद्धा संभाची सवय लागत गेली. तो हुशार तर होताच. पण पडेल ते काम करायची तयारी आणि नविन गोष्टी शिकुन घ्यायची ईच्छा या मुळे हळु हळु तो सगळ्यांचाच लाडका बनला. दोन वर्षे हा हा म्हणता निघुन गेली. एके दिवशी संभा पेढे घेवुन आला.....विशाल सर बारावी झालो...६५% मिळाले."अरे तु अभ्यास कधी केलास, परिक्षा कधी दिली?..पण ग्रेट यार....मानलं तुला.........!"सर, रात्रीच्या शाळेतुन शिकतोय. आता पण एखाद्या नाईट कॉलेजमध्ये अँडमिशन घेवुन पुढे शिकायचं ठरवलंय...!"मी अवाक झालो. मी कधी पासुन ठरवतोय बाहेरुन ME करायचं म्हणुन , पण मुहुर्त लागत नाही...आणि हा......................ग्रेट !असेच काही दिवस गेले, मी त्याला विद्यापिठात घेवुन गेलो आणि पाठक सरांशी ओळख करुन दिली. आमच्या कंपनीने मुंबई विद्यापिठात काही फॅक्स मशीन्स विकली होती, त्याची सर्व्हिसिंग मीच पाहायचो. त्यामुळे सरांशी चांगली ओळख होती. सरांनी प्रयत्न करुन संभाला अँडमिशन मिळवुन दिली. फी चे पैसे देखिल मी आणि सरांनी मिळुन भरले."आता नाईट कॉलेज मध्ये जावुन जागरणं करायची गरज नाही. आणि काही पैसे वगैरे लागले तर सांगत जा...!"त्याची नेहेमीचीच प्रतिक्रिया...डोळे भरलेले आणि हात जोडलेले....!
त्या कंपनीत वर्षभर होतो मी त्यानंतर. मग मध्येच हि सद्ध्याची OmniSTAR B.V. ची ऑफर आली. आणि मी ती कंपनी सोडली. जाताना संभाला सांगुन गेलो होतो कि काही लागलं तर फोन कर म्हणुन.वर्षभर संभाचे फोन येत राहिले. खुशाली कळवणारे. मागणी मात्र कधीच नव्हती. ते त्याच्या स्वभावातच नव्हतं म्हणा. नंतर हळु हळु फोन बंद होत गेले. माझाही व्याप वाढत होता , पगाराबरोबर दौरेही वाढले होते. मी ही हळु हळु विसरुन गेलो. मागे एकदा असेच ठाण्याला गेलो असता जुन्या ऑफिसमध्ये चक्कर टाकली तेव्हा कळले की संभाने नोकरी सोडली. परिक्षेच्या वेळेस त्याला एक महिन्याची सुटी हवी होती अभ्यासासाठी. कंपनीने नाकारली....संभाने नोकरी सोडली यात मला काही विशेष वाटले नाही. कारण त्याचे शिक्षणाचे वेड मला चांगले माहित होते.
त्यानंतर असेच काही दिवस गेले. आमचे दोनाचे चार हात झाले. कुर्ल्याहुन मी खारघरला शिफ्ट झालो.आणि एके रविवारी सकाळी सकाळी संभाची स्वारी अगदी आईसोबत माझ्या दारी अवतिर्ण झाली.आल्या आल्या माझ्या आई आण्णांच्या पाया पडला. माझ्याकडे यायच्या आधीच मी खुर्चीवर मांडी घालुन बसलो."कुर्ल्याला गेलो होते सर. तिथे शेजारी समजलं की तुम्ही खारघरला शिफ्ट झाला आहात म्हणुन मग शोधत शोधत इथे आलो. आई हेच ते विशालसर , ज्यांच्या बद्दल मी नेहेमी बोलत असतो."त्या माऊलीने हात जोडले.." लई उपकार जाले सायेब, तुमच्यामुळं माज्या पोराची जिनगानी सुदरली.."मला उगाच लाजल्यासारखं झालं. आई आण्णांना तर काय चाललंय ते काहीच कळत नव्हतं. मी त्यांना हळुच खुणावलं..नंतर सांगेन म्हणुन...."विशालसर बी. ए. झालो, इंग्लिष घेवुन. तुमची खुप मदत झाली सर ", त्याने नेहेमीप्रमाणेच भरल्या डोळ्यांनी हात जोडले. मी त्याचे हात हातात घेतले आणि म्हणालो.."संभाजीराव श्रेय द्यायचे असेल तर ते तुमच्या आईला, तिच्या मेहनतीला द्या. मी फक्त हातचं काही न राखता शक्य तेवढी मदत केली. बाकी सगळं श्रेय तुझी चिकाटी, परिश्रम आणि अभ्यासाचं आहे. असो..आता पुढं काय करणार आहेस.""सर, विवेकानंद केंद्र , कन्याकुमारीच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एकुण अठरा निवासी शाळा आहेत. त्यापैकीच एका शाळेत इंग्लिश शिकवायला चाललोय. शिक्षणाचं महत्व मला कळालंय. त्याचा फायदा तिथल्या गरिब मुलांना झाला तर बघतो. पगार नाही मिळणार फार..पण मी ठरवलंय लग्न करायचं नाही म्हणुन. आणि मी व माझी आई....आम्हा दोघांना असं कितीसं लागतंय. येतो सर. तुम्हाला न भेटता गेलो असतो तर मनाला खात राहिलं असतं..आता चिंता नाही."
त्या माय लेकांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघताना मला माझा खुजेपणा अगदी प्रकर्षाने जाणवला. मी नकळतच हात जोडले.
विशाल.



Tuesday, December 16, 2008

प्राजक्त

झुकली पापणी अन
एकवटला देह सारा
मौन बरसला प्राजक्त
...........मी वेचलाच नाही!

चुंबितो मातीस काळ्या
धुंद आषाढ हिरवा
मुग्ध मोहरला प्राजक्त
...........मी ऐकलाच नाही!

भेदुन गंधाळ धरती
डोकावी हिरवी पाती
ओघळला सवे प्राजक्त
...........मी पेललाच नाही!

संन्यस्त माळ लावतो
ध्यान उन्ह सावल्यांचे
मुक कोसळला प्राजक्त
...........मी झेललाच नाही!

दंवबिंदुंचे हळवे स्पंदन
पालवीचे हिरवे रुदन
रेंगाळला स्तब्ध प्राजक्त
...........मी माळलाच नाही!

विशाल...

Saturday, December 13, 2008

तेव्हा तुझं आभाळ पाहून ...श्री. वैभव जोशी

वैभवजी, तुमची हि कविता माझ्या संकेतस्थळावर टाकायची परवानगी दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

तेव्हा तुझं आभाळ पाहून
गाणं सुचलं नसतं तर
मागत बसलो असतो मी ही
वर पाहून रोज न्याय
कळले नसते गाणा-याला
राग नसतो लोभ नसतो
ओठांवरती गाणे असता
उन्ह काय मेघ काय

तेव्हा तुझं आभाळ पाहून
गाण्यात रमलो नसतो तर
वेचत बसलो असतो मी ही
एक दोन चिल्लर तारे
मोजत बसलो असतो नंतर
तुटपुंजी ही मिळकत माझी
कळले नसते - गाणे सुचता
हाती येते आभाळ सारे

तेव्हा हाती आभाळ येता
वाटलं सगळं कळलं पण
वाटलं नव्हतं ह्यातसुध्दा
असू शकते मेख काही
गाणं सुचता आभाळ मिळते
ह्यात शंका नाही पण
हाती आभाळ असले म्हणजे
गाणे सुचते ऐसे नाही... !!!

Friday, December 12, 2008

हिरवाई_एक प्रतिसाद

माझ्या "हिरवाई" या कवितेवरील चित्र पाहुन मायबोलीवरील एक सातत्याने दर्जेदार लेखन करणारे कवि श्री. सत्यजीत माळवदे यांनी लिहीलेली आणखी एक सुंदर कविता .सत्यजीत, हि कविता इथे टाकण्याची परवानगी दिल्याबद्दल मंडळ मनापासुन आभारी आहे.

नागीण काळ्या वाटे भवती
पिवळी नाजूक रानफ़ुले
दरी दरीतुन सफ़ेद धारा
पर्वतांवर धुके झुले

हरित कुंचल्यानी शिंपली
लिंपली सारी पाने फ़ुले
क्षणात वाटे तिथे जावे
जिथे पावसा उन मिळे

कधी नभ भरुन श्वास घ्यावा
कधी पहावे आभाळ खुले
कधी आडोशी पाउस पहावा
कधी व्हावे बाळ खुळे

ओढ्यांचे चाळ बांधता
खळखळ पावलांस वेग मिळे
थरथर कांती उठे शहारा
परी न आवरे मन खुळे . . .

सत्यजित.

हिरवाई


इथे वाढला वसंत,
दंवे ओलावली माती सुखकर
थांब ऐकु दे समीरा
गीत हिरवाईचे निवांत क्षणभर
थांब जरा बोल हळु
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर
बघ निशःब्द रानवेली
अलवार करीती नाजुक कुरकुर
ओज कसे वृक्षगर्भी
ओल्या पानांची किंचीत थरथर
झाडांमधुनी नागमोडी
वाट जशी कुणी नार अटकर
हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर
इथे ओलावला वसंत
पालवी गाते हिरवाई निरंतर
सभोवार सौंदर्य फाकले
क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर

Wednesday, December 10, 2008

चाहुल


पानांची कुजबुज कानी आली
त्यांनीही माझी प्रिया पाहिली

रातराणी मम कानी वदली
तिला सुखाची चाहुल लागली

प्राजक्त अंगणी फुलुनी आले
मनी मानसी बहर उमलले

हिरव्या गवतात फुल एकले
त्यानेही तिचे गीत ऐकले

क्षितीजी इंद्रधनुष्य लाजले
डोळे जेव्हा तिचे पाहीले

अधीर लाजर्‍या डोळ्यांमधले
मौन अलगद ओठी आले

आता सारे द्वैत निमाले
गाणे माझे सुगंधी झाले

भारतीय


हे जळणं आता रोजचंच आहे
बंदुकीच्या गोळीशी आमचं
नातं फार जवळचं आहे
बंदुक माझ्याकडेही आहे
पण चापावर बोटच येत नाही
मी अगदी शांत आहे
..........कारण मी भारतीय आहे

मी कधीचा शांतता मागतोय
ते मात्र आर. डी. एक्स. देताहेत,
आणि देताहेत
निष्प्राण, जळलेली, तुटलेली
माझ्याच स्वप्नांची, आकांक्षाची प्रेते
पण मी शांत आहे
...........कारण मी भारतीय आहे

त्यांचा जोर वाढतोय
माझा भारत कधीचा जळतोय
ते निर्धास्त आहेत
पुन्हा पुन्हा नव्या जोमाने
बापुंच्या कन्येवर बलात्कार करताहेत
त्यांना माहितीये मी शांत आहे
..........कारण मी भारतीय आहे

खबरदार..
माझा अंत पाहु नका
मी जळेन तुमच्या वणव्यात
पण उरेन मागे तरीही
ठिणगी बनुन..
तुम्हाला संपवायला
ती एकच ठिणगी पुरेशी आहे.
कारण..
विसरताय तुम्ही..
वरवर शांत भासत असलो
तरी अखेर...मी भारतीय आहे.

अंधारभुल


रात्रीची निरव शांतता
अन गोठलेले रान सारे
सुकलेल्या पाचोळ्याचे निश्वास
अन जागतेय रान सारे...

पक्षी आपले पंख पसरतील
पहाटेची मग चाहुल लागेल
सुकलेली कोरफडही
मग नकळत धुंदावेल...

वसंताची चाहुल मग
अंगोपांगी रोमांच फुलवील
रानफुलाचा मग उग्र गंधही
रान सारे बहरुन टाकेल...

अन अंधाराच्या राज्याला
फुटतील काजव्यांचे डोळे
होइल जागे हळु हळु मग
रान सारे काजळलेले...

मंद समीराची धुंद फुंकर
अंधारभुल मग होईल धुसर
अंधाराच्या रानाला फुटतील
प्रकाशाचे कोवळे अंकुर...