Wednesday, December 10, 2008

तु नसताना...


तु नसताना मनी दाटती
भाव तुझ्या स्मृतींचे काही
आठवणींचे फुलपाखरु
शुभ्र धुक्यातुन विहरत जाई...

विरहात तुझ्या हा चंद्र रोजचा
तोही भासे प्रिये कळाहिन
खिन्न भासे आकाशगंगा
फिके जाहले सर्व नभांगण...

तु नसता सखे सभोवती
तुझेच केवळ तुझेच भास
या समीराच्या कणाकणातुन
फिरतो आहे तुझाच श्वास...

तु नसताना झोप जागते
वैरीण होवुन मला झुरवते
दिवस चालला कुर्मगतीने
रात्र उसासे टाकीतसे...

उतरेना आता कंठाखाली
घासही सखे तु नसताना
विसरु म्हणता विसरत नाही
आठवण तुझी तु नसताना...

कां ...?


हि प्रतारणा करावी
तु येताच स्वप्नांमध्ये
नेमकी हि जाग यावी...?

माझ्याच मनाने सदा
माझी वंचना करावी
जेंव्हा कधी मी हंसावे
अश्रुंची कास धरावी...?

रातराणी तिही माझ्या
कानात कुजबुजावी
साथ एवढी आपली
जाणिव तिने करावी ...?

मिटुनी घेतले ओठ
अडवीले शब्द जरी
हुंदक्यांनी निघण्याची
का करावी तयारी...?

सल


त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न
कधीचा मनात सलतो आहे,
सलता सलता माझ्या अस्तित्वाला,
अलगद कुरतडतो आहे......!!
त्यांच्या त्या वि़खारी नांग्या,
आणि ते दाहक दंश..
माझ्या जाणीवाही खाल्ल्याहेत,
तोडुन , कुरतडून त्यांनी,
हळु-हळु त्यांचा प्रवास माझ्या,
मनापर्यंत येवुन पोचतो आहे.
त्यांच्या अस्तित्वाचा विचार करताना,
मी माझंच असणं जाळतो आहे,
त्यांना संपविणे आवश्यक आहे..!
कारण पिंजरे लावणे, सापळे ठेवणे..
ही सोय आहे तात्पुरती..
मला मात्र कायम त्यांच्या...
पुढच्या पीढीची चिंता सलते आहे.

बरे नाही !


हे असे
पुन्हा, डोकावणे बरे नाही.
चालताना
उगाच, वेडावणे बरे नाही.
मनी दाटले
भाव, लपवणे बरे नाही.
मज स्मरते
ती वाट, थबकणे बरे नाही.
आता तुझे
चोरुन, मज वाचणे बरे नाही.
तु चाल पुढे,
मागे वळुन, उसासणे बरे नाही.
हे माझे तुला
आता, विसरणे सुरु झाले.
तुझे असे
मनात माझ्या, रेंगाळणे बरे नाही.

सावली


सुर्याची पिल्ले,
पायावर रेंगाळायला लागली..
माझ्याही नकळत माझी,
झोप मग जागायला लागली..
आळसावलेल्या डोळ्यांनी,
आरक्त क्षितीजा न्याहाळ्ली..
आणि अलगद,
...तुझी आठवण आली.

मग त्या वळणावरची,
पहिली वहिली भेट आठवली.
तुझी पाठमोरी सावली,
वेणीला बसणारे मादक हेलकावे..
तेव्हाही साक्ष होती..
सुर्यकिरणांची,
... आरक्त लाली.

आताशा धुसर होवु लागलीय,
क्षितीजा अन तिची आरक्तताही,
मात्र अजुनही खुणावतेय...
तिथेच रेंगाळलेली..
अजुनी तुझी वाट पाहणारी..
... माझी वेडी सावली.

"माय"


कधीमधी उगाचच वाटत राहतं,
आपणही आभाळ व्हायला हवं होतं..
मायच्या फाटक्या नशीबावर,
फाटकं का होईना..
पांघरुण व्हायला हवं होतं.

पापणी होऊन अलगद,
तिच्या आसवांना झेलायला हवं होतं..
तिच्या आयुष्यातल्या अंधारावर,
चांदणी होवुन का होईना ..
भरपुर पाझरायला हवं होतं.

तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर,
जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं..
राहुन राहुन मन खंतावतंय,
एकदा का होईना तिच्या कुशीत शिरुन..
मनसोक्त रडायला हवं होतं.

घर


तुझ्या
एका हंसण्यानं
आपल्यातलं
सारे अंतर
पार केलंय.
मधल्या...
सगळ्या...
भिंती पाडुन
मी
तिथे एक
दार केलंय.
स्वप्नात
पाहण्यासाठी
छोटंसंच..
एक घर
शोधलंय
तु
लवकर ये
तुझ्या माझ्या
घरासाठी
मी एक
नावही
ठरवलंय.
येशील ना ?

तु...


तुझं अलगद येणं
माझ्या जाणिवांनी
टिपलं होतं.
तुझं नकळत जाणं
माझ्या डोळ्यांनाही
जाणवलं होतं.
तु आलीस
तेव्हा अंगणातला
प्राजक्त
बहरला होता.
जाई-जुई
कुजबुजायला
लागल्या होत्या.
आता
तु नाहीस...
बघ..
मोगर्‍याने सुद्धा
मान टाकलीय.

'निवृत्ती'


आयुष्याच्या वळणावरचा..
अन्तिम टप्पा सार्थकतेचा!
पुर्णतेचा, परिपुर्णतेचा..
शुचितेचा, सुख-प्राप्तीचा..
उन्नतीचा...निवृत्तीचा !

आयुष्याच्या वाटेवरची...
सर्वोच्च पावती तृप्ततेची!
सुखाची, समाधानाची..
गोडी आगळी कर्तव्यपुर्तीची..
जाणीव सुखाची...निवृत्तीची!

मार्ग जिवनाचा, तृप्त मनाचा..
ऐहिकतेच्या विलोपनाचा!
भौतिकाच्या निरोपाचा..
पारमार्थिक प्रारंभाचा..
वेध तो अद्वैताचा..अनंताचा!

ज्ञानराज माऊली म्हणतसे..
मी वेडा 'सोपान' 'मुक्तीचा'..
हरीने कथिला मज..
मार्ग सुखाचा..
तो एकमेव ...निवृत्तिचा !!

भान


लाजुनी अशा या वेळी
का पाहतेस गं खाली,
मज वाटे चुंबुन घ्यावी
या डोळ्यामधली लाली,
खुणावते मज खट्याळ
बट रेंगाळे तव भाळी,
ओठामागुनी साद घाली
तव गालावरची खळी,
सोडुनी मोह स्वप्नांचा
मी तुझे लाविले ध्यान,
विसरुनी बसलो सारे
मी अवघे देह-भान!