Wednesday, December 10, 2008

धावाक्षुब्ध कौरवसभेत
असहाय उभी
एकवस्त्रा, रजस्वला
याज्ञसेनी.....
पांचालीच्या
पदराला हात घालणारे
उन्मत्त दु:शासन,
सत्तेच्या धुंदीत चुर
मदाधूंद दुर्योधन,
अधःपतीत,
भरकटलेले अंगराज,
अंध, स्वार्थांध
विवेकहिन धृतराष्ट्र,
कुटील ,
विकृत शकुनी,
हताश,
निराश पितामह,
थकलेले कृपीपुत्र,
अन् हतोत्साहित...
विदुरकाका !
पत्नीला पणाला लावणारे
पराक्रमी (?) पांडुपुत्र,
आहेत...
आजही हे सगळे आहेत,
या कुरुक्षेत्रात
मी मात्र गलितगात्र झालोय,
किंकर्तव्यमुढ पार्थासारखा!
महाभारती
द्रौपदी रक्षीलीस..
आज कुठे आहेस
कृष्णा, परमात्म्या..
आज तु कुठे आहेस?

No comments: