Wednesday, December 10, 2008

भारतीय


हे जळणं आता रोजचंच आहे
बंदुकीच्या गोळीशी आमचं
नातं फार जवळचं आहे
बंदुक माझ्याकडेही आहे
पण चापावर बोटच येत नाही
मी अगदी शांत आहे
..........कारण मी भारतीय आहे

मी कधीचा शांतता मागतोय
ते मात्र आर. डी. एक्स. देताहेत,
आणि देताहेत
निष्प्राण, जळलेली, तुटलेली
माझ्याच स्वप्नांची, आकांक्षाची प्रेते
पण मी शांत आहे
...........कारण मी भारतीय आहे

त्यांचा जोर वाढतोय
माझा भारत कधीचा जळतोय
ते निर्धास्त आहेत
पुन्हा पुन्हा नव्या जोमाने
बापुंच्या कन्येवर बलात्कार करताहेत
त्यांना माहितीये मी शांत आहे
..........कारण मी भारतीय आहे

खबरदार..
माझा अंत पाहु नका
मी जळेन तुमच्या वणव्यात
पण उरेन मागे तरीही
ठिणगी बनुन..
तुम्हाला संपवायला
ती एकच ठिणगी पुरेशी आहे.
कारण..
विसरताय तुम्ही..
वरवर शांत भासत असलो
तरी अखेर...मी भारतीय आहे.

No comments: